सेल्फीच्या नादात आई-वडील आणि मुलगा नदीत वाहून गेले

470

बुलढाणा, दि. २३ (पीसीबी) – सेल्फी घेत असताना नदीत मुलगा पडल्याने आई आणि वडील दोघांनी त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र नदीचा प्रवाह जास्त असल्याने तीघेही नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पूर्णा नदीच्या खिरोडा पुलाजवळ घडली.

राजेश चव्हाण (वय ४२) पत्नी सारिका (नय ३५) आणि मुलगा श्रावण (वय ११) असे पूर्णा नदीत वाहून गेलेल्या एकाच कुटूंबातील तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद तालुक्यात बुलडाणा अर्बन या पतसंस्थेत कार्यरत राजेश चव्हाण नवीन दुचाकी खरेदी केली होती. म्हणून पत्नी सारिका आणि मुलगा श्रावण  यांच्यासह ते शेगावला फिरायला गेले होते. परत जळगाव-जामोदकडे निघाले असता संग्रामपूर तालुक्यातील पूर्णा नदीच्या खिरोडा येथील पुलावरून जात असताना पावसामुळे फुललेला निसर्ग आणि नदीचा जलस्तर पाहून त्यांना सेल्फी घेण्याचा मोह झाला.  दुचाकी थांबवून त्यांनी नदीजवळ जावून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. सेल्फी घेत असतानाच सुरुवातीला मुलगा पाण्यात पडला. त्यानंतर आई आणि वडील एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात हे तिघेही या पूर्णा नदीच्या पाण्यात वाहून गेले. हा संपूर्ण प्रकार या पुलावरून जाणाऱ्या गावकऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी या तिघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिस शोध मोहीम राबवित आहेत.