सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील – शरद पवार

74

बारामती, दि.२७ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे कॉग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

पवार म्हणाले, करोनाचे संकट सर्वांवर परिणाम करणारं आहे. करोनामुळे देशाची अर्थव्यवस्थेची स्थितीही गंभीर झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही शासनानं सूचना केल्या आहेत त्या पाळाव्य़ा. सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील, असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना पवार यांनी सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं स्वागत केले. आपली कर्तव्य आपण पार पाडली पाहिजे. आपण लोकांशी संपर्क टाळला पाहिजे. गुरूवारी ज्या पॅकेजची घोषणा केली ते शेतीसाठी पुरेसे आहे असे मला वाटत नाही, असंही पवार यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांचं खातं एनपीएमध्ये नसावं याची सरकारनं काळजी घ्यावी. सरकारनं प्रभावी पावले टाकली पाहिजेत. देशातील ८० कोटी जनतेला सरकारने मोफत धान्य देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. करोनाच्या लढ्यात डॉक्टर, पोलीस कर्मचारी अथक मेहनत घेत आहेत. त्यांनाही आपण प्रोत्साहन द्यायला हवे असेही ते त्यांनी नमूद केले. राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना यांनी काही निर्णय तातडीने घेतले आहेत. करोना संकट लक्षात घेऊन आपण हे सगळं करतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. करोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं, देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होणार आहे, यात काहीही शंका नाही असंही शरद पवार यांनी म्हटले आहे. करोनाशी लढा आपण एकत्रितपणे देऊ. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा असेही आवाहन शरद पवार यांनी केले.