सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकवले – राहुल गांधी

67

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकवले असून हा भारताच्या शूरवीर जवानांचा विश्वासघात आहे, अशी टीका भारत आणि चीनमधील डोकलाम वादावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्यावर केली.

डोकलाम वादावरुन सुषमा स्वराज यांनी बुधवारी (दि. १) लोकसभेत माहिती दिली होती. ‘डोकलामचा वाद राजकीय परिपक्वतेने मिटवण्यात आला असून देशाने एक इंचदेखील जमीन गमावलेली नाही, जैसे थे परिस्थिती कायम राखली गेली आहे, असे त्यांनी सांगितले होते. सुषमा स्वराज यांनी हे संसदेत स्पष्टीकरण दिले असतानाच दुसरीकडे अमेरिकेने डोकलामसंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले होते.

भारत आणि चीनने माघार घेतले असली तरी चीन छुप्या पद्धतीने डोकलाममध्ये सक्रीय होत आहे, असे अमेरिकेने म्हटले होते. याचा दाखला देत राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन सुषमा स्वराज यांच्यावर टीका केली. ‘सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकले. सरकारने अशा पद्धतीने चीनसमोर लोटांगण घातल्याने सीमेवर तैनात असलेल्या जवानांचाही विश्वासघात केला, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.