सुब्रमण्यम स्वामींच्या वादग्रस्त ट्विटप्रकरणी मालदीवचे भारत सरकारला समन्स

159

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मालदीव  देशाविषयी केलेल्या एका ट्विटवर मालदीवने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  मालदीव सरकारने भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा यांना  समन्स पाठवले  आहे. यात स्वामींचे हे ट्विट चिंताजनक आणि आश्चर्यचकित करणारे आहे, असे मालदीवने म्हटले आहे.  बोलभांड  सुब्रमण्यम स्वामी यांच्या एका ट्विटमुळे केंद्र सरकारची डोकेदुखी झाली आहे.

आम्ही तुम्हाला १९८८ साली तामिळ दहशतवाद्यांपासून वाचवले होते. त्यावेळी मालदीवमध्ये भारतीय लष्कराला पाठवण्यात आले होते. तेव्हा कोणी आक्षेप नोंदवला नव्हता असे म्हणत मालदीवमध्ये निवडणुकीच्या दरम्यान गडबड झाली, तर भारताने त्यांच्यावर आक्रमण केले पाहिजे, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी २४ ऑगस्टरोजी केले होते. दरम्यान, स्वामी यांच्या या विधानावर भारत सरकारने खुलासा  करण्यास नकार दिला होता. स्वामी यांचे ते वैयक्तिक मत आहे.  कोणालाही काही बोलण्यापासून रोखता येणार नाही, असे सरकारने म्हटले होते.

दरम्यान, स्वामी यांच्या ट्विटनंतर अनेक मालदीव नागरिकांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. भारताने प्रथम आपल्या अडचणी दूर कराव्यात. आम्ही कोणालाही हल्ला करण्याची संधी देणार नाही. आम्ही लढू, आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही, अशा शब्दांत एका युजरने म्हटले आहे.