सुप्रिया सुळेंच्या दस्ताचा क्रमांक वापरून बोगस दस्त नोंदणी; दीपक मानकरांचा कारनामा

0
5362

पुणे, दि. २३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, पंचशील टेक पार्कचे उद्योजक अतुल चोरडिया, उद्योजक अरुण फिरादिया यांच्या नावे नोंद असलेल्या दस्ताचा क्रमांक वापरून बनावट व बोगस दस्त नोंद केल्याप्रकरणी पुण्याचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

दीपक मानकर आणि त्यांची सहकारी साधना वर्तक यांनी अदिती माधव दीक्षित व मेधा प्रभाकर दीक्षित यांच्या नावे कुलमुखत्यारपत्र ५४६३/२००३ व ५६१४/२००३ दस्तऐवज बनवून शिवाजीनगर येथील प्लॉट क्रमांक ५२९ वरील २० हजार चौरस फूट जागा आपल्या ताब्यात असल्याचे दाखवले. त्याआधारे रास्ता पेठ येथील मुकुंद दीक्षित यांच्याकडून ५० हजार चौरस फूट जागा दीड कोटी रुपयांना विकत घेऊन त्या जागेच्या बदल्यात शिवाजीनगर येथील जागा देणार असल्याचे सांगितले. तसेच ४५ लाख ९० हजार रुपये कमी करावे, असे सांगत व्यवहार केला. मात्र, प्रत्यक्षात शिवाजीनगर येथील कुलमुखत्यारपत्राचे दस्त क्रमांक हे खासदार सुप्रिया सुळे, पंचशील टेक पार्कचे उद्योजक अतुल चोरडिया, उद्योजक अरुण फिरादिया यांच्या नावे नोंद असल्याची बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे, असे रवींद्र बऱ्हाटे यांनी सांगितले.

४८१ रास्ता पेठेतील मिळकत सांभाळण्याच्या वादातूनच मानकर यांचा कार्यकर्ता जितेंद्र जगताप याने आत्महत्या केली  आहे. त्याप्रकरणी मानकर सध्या कारागृहात आहे. संबंधित मिळकत ही मानकर यांनी मुकुंद परशुराम दीक्षित यांच्याकडून दीड कोटी रुपयांना विकत घेतल्याचा करारनामा लिहून घेतल्याचे बऱ्हाटे यांनी सांगितले.

पोलिसांनी याबाबत तपास केला असता त्यांनी अदिती दीक्षित यांनी मानकर व वर्तक यांना कोणतेही दस्त लिहून दिले नसल्याचे सांगितले. बिबवेवाडी येथील सहदुय्यम निबंधक हवेली यांच्याकडे अर्ज करून दस्त क्र. ५४६३/२००३ बाबत माहिती मिळवली असता ती खासदार सुप्रिया सुळे यांच्या मे. सुप्रिया होडिंग प्रा. लि यांच्या मालकीची सर्व्हे नं. ११ क्षेत्र २,११,००० चौ. फूट, औंध येथील मिळकत रोहन डेव्हलपर्स यांनी विकसित करून रोहन मिल या नावाने प्रकल्प बांधल्याचे स्पष्ट झाले.