सुपरस्टार हा एकच, बाकीचे फक्त स्टार्स – तापसी पन्नू

178

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – पिंक, नाम शबाना, बदला अशा चित्रपटांमधून अभिनेत्री तापसी पन्नूने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. कायमच अभ्यासपूर्ण भूमिका साकारणारी ही अभिनेत्री सांगतेय की, बॉलिवूडमधील स्टार होण्यासाठी मला अजून खूप वेळ आहे.

डेक्कन क्रोनिकलला दिलेल्या एका मुलाखतीत तापसी म्हणाली की, “फक्त एकच सुपरस्टार असतो, बाकी सगळे फक्त स्टार असतात. चित्रपट चांगला असला किंवा नसला तरीही स्टार कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठराविक कमाई करतातच. सलमान खान, शाहरुख खान, अजित कुमार हे मोठे कलाकार आहेत त्यांचे चित्रपट सुरुवातीलाच ठराविक कमाई करतातच.”

“ज्या दिवशी चित्रपटाविषयी कोणतीही माहिती नसताना फक्त तापसी आहे म्हणून प्रेक्षक चित्रपट बघायला येतील, त्या दिवशी मी ‘स्टार’ झालेले असेन.” असेही तापसी म्हणाली. तापसी म्हणाली की, “मी नेहमी असेच चित्रपट निवडते की ज्यामध्ये स्त्री भूमिका सशक्त असतात. लहान भूमिका घ्यायलाही माझी काही हरकत नाही. त्या भूमिका तितक्या महत्त्वाच्या असतील तर मी नक्कीच घेईन. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतरही प्रेक्षकांना मी लक्षात राहायला हवे.”

सध्या तापसी तिच्या आगामी गेम ओव्हर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ‘गेम ओव्हर’ हा एक थरारपट आहे.  या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे देखील सांगितले आहे.