सुनील तटकरे यांच्यावरील आरोपाप्रकरणी चंद्रकांत पाटलांची दिलगिरी

48

नागपूर, दि. १६ (पीसीबी) – इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात सात पाने गुजराती भाषेत छापल्यावरून विधान परिषदेत गदारोळ उडाला होता. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना ‘तुम्हीच ही पाने जोडली असतील’, असा आरोप केला होता. या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी आज (सोमवारी) सभागृहात दिलगिरी व्यक्त केली.  

इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात सात पाने गुजरातीत भाषेत छापल्यावरून विरोधकांनी शुक्रवार (दि. १३) गोंधळ घातला. दरम्यान यावर सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सुनील तटकरेंवर “तुम्हीच जोडून आणली ही पाने’, असा आरोप केला. त्यावर तटकरे यांनी “हे मी छापून आणले हे तुम्ही सिद्ध केले. तर येथेच विष घेऊन आत्महत्या करीन’, असा इशारा दिला होता.

यावर आज (सोमवारी) शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निवेदन केले. इयत्ता सहावीच्या मराठीच्या ११ लाख ५० हजार प्रती छापण्यात आल्या. ११ मुद्रकांना हे काम सोपविले होते. त्यापैकी १ लाख प्रतींच्या छपाईचे व बांधणीचे काम गुजरातमधील श्लोक प्रिंट सिटी प्रिंटर्स यांना दिले होते. त्यात बाईंडीग करताना मराठी भूगोलाच्या पुस्तकात गुजराती पुस्तकाची पाने जोडण्यात आली. ही सदोष बांधणीची पुस्तके बालभारतीची सर्व विभागीय भांडारे तसेच मंडळाच्या नोंदणीकृत वितरकाकडून बदलवून देण्यात येईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले.