सीमा सावळे यांच्या दट्ट्यानंतर इंद्रायणीनगरमधील सुस्थितीतील रस्त्यांवर १०० कोटी खर्चाचा डाव फसला

241

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – इंद्रायणीनगरमधील सुस्थितीतील तीन रस्ते खोदून पुन्हा त्यावर १०० कोटी रुपये खर्च करण्याच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्यात झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी आयुक्तांना धारेवर धरले होते. स्वपक्षाच्याच नगरसेविकेने डोळ्यात अंजन घातल्यामुळे सत्ताधारी भाजप तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर या दोघांनीही सपशेल माघार घेतली. सुस्थितीतील रस्त्यांवर खर्चासाठी केलेली तरतूद शून्य करण्याची उपसूचना बुधवारी (दि. २७) झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आली. तसेच रस्त्यांची पाहणी केल्याशिवाय अशा प्रकारे नाहक खर्च करण्याचे विषय पुन्हा सभागृहापुढे आणू नयेत, अशीही उपसूचना सावळे यांनी सभागृहात मांडली.

महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातील विविध कामांसाठी तब्बल २६५ कोटी रुपयांची तरतूद वर्ग करण्याचे पाच प्रस्ताव जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या या सभेत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी तरतूद वर्गीकरणाच्या पाच प्रस्तावांमध्ये इंद्रायणीनगरमधील सुस्थितीतील तीन रस्ते खोदून त्यावर १०० कोटी रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. सद्यस्थितीला तीनही रस्त्यांसाठी प्रत्येकी ३ कोटी रुपये वर्गीकरण करण्याचे प्रस्तावात नमूद होते. नंतर या रस्त्यांवर १०० कोटी रुपये खर्च केले जाणार होते. या प्रस्तावावरून नगरसेविका सीमा सावळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर धारेवर धरले.

शहराच्या अन्य भागातील अनेक रस्त्यांवर साधे डांबरही पडलेले नाही. या रस्त्यांवरून कसरत करत नागरिकांना तो पार करावा लागतो. असे असताना एकही खड्डा न पडलेले आणि सुस्थितीतील रस्ते खोदून त्यावर पुन्हा १०० कोटींचा खर्च कोणासाठी केला जात आहे?, असा सवाल त्यांनी आयुक्तांना केला होता. स्वपक्षाच्या नगरसेविकेने वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून डोळ्यात अंजन घातल्यामुळे सत्ताधारी भाजप आणि आयुक्त श्रावण हर्डीकर या दोघांचीही सभागृहात कोंडी झाली होती. त्यामुळे महापौर काळजे यांनी हा विषय तहकूब करून सभाही तहकूब केली होती. तहकूब केलेली ही सभा बुधवारी दुपारी तीन वाजता पार पडली. वर्गीकरणाच्या पाच विषयांपैकी इंद्रायणीनगरमधील तीन रस्त्यांसाठी वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव तहकूब केल्यामुळे त्यावर सभागृहात चर्चा झाली नाही.

त्यानंतरच्या वर्गीकरण विषयाला नगरसेविका सीमा सावळे यांनी इंद्रायणीनगरमधील सुस्थितीतील रस्ते खोदून पुन्हा त्यावर खर्च करण्यासाठी केलेली तरतूद शून्य करावी. तसेच रस्ते करताना त्याची पाहणी केल्याशिवाय अशा प्रकारचे विषय सभागृहापुढे पुन्हा आणू नये, अशी उपसूचना दिली. त्याला महापौर नितीन काळजे यांनी मंजुरी दिली. त्यानंतरच्या अन्य चार वर्गीकरणाच्या विषयांना विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी विरोध केला. तसेच मतदान घेण्याची मागणी केली. महापौर काळजे यांनी वर्गीकरणाच्या एका विषयावर नगरसचिव उल्हास जगताप यांना मतदान घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सभागृहात मतदान घेण्यात आले.

भाजपच्या ६६ नगरसेवकांनी बाजूने, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ३७ नगरसेवकांनी विरोधात मतदान केले. त्यामुळे वर्गीकरणाचा विषय ६६ विरूद्ध ३७ मतांनी मंजूर करण्यात येत असल्याचे महापौरांनी जाहीर केले. त्यानंतरच्या वर्गीकरणाच्या विषयांनाही दत्ता साने यांनी विरोध केला. महापौर काळजे यांनी राष्ट्रवादीचा विरोध नोंदवून घेत विषय मंजूर केले. परंतु, या विषयांवरही मतदान घेण्याची मागणी साने यांनी केली. महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातला. महापौरांचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या. या गोंधळातच महापौर काळजे यांनी अन्य दोन विषय मंजूर करत सभागृहाचे कामकाज संपल्याचे जाहीर केले.