सीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप    

556

औरंगाबाद, दि. १९ (पीसीबी) – माझे पती सचिन निर्दोष असून त्यांचा  कुठल्याही संघटनेशी संबंध किंवा संपर्क  नाही. मात्र,  पोलिसांना २० ऑगस्टपर्यंत कुठल्या न कुठल्या आरोपीला अटक करायची होती,  म्हणून त्यांनी माझ्या पतीला  अडकवले आहे, असा आरोप नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी अटक केलेल्या सचिन अंदुरे यांची पत्नी शीतल अंदुरे यांनी  केला आहे.

माझा पती निर्दोष असून त्याला गोवण्यात आले आहेत.  १४ ऑगस्टला  एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आमच्या घराची झाडाझडती घेतली, तेव्हा त्यांना एकही आक्षेपार्ह  गोष्ट आढळून आलेली  नाही. त्यानंतर १६ ऑगस्टला सचिन यांना एटीएसच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा घरी सोडले आणि तुमचा पती निर्दोष असल्याचे  सांगितले.

मात्र,  सीबीआयने पुन्हा माझे पती सचिन यांना चौकशी करायची असल्याचे  सांगून पुन्हा अटक केली आहे. तसेच चौकशी करून सोडून देतो, असेही सीबीआयने म्हटले होते.  मात्र, त्यांना न सोडता त्यांच्यावर आरोप करून त्यांना अडकवण्यात आले आहे, असा आरोप शीतल यांनी केला आहे.

सचिन यांना मी कॉलेजपासून ओळखत असून ते असेही काही करणारच नाहीत, याबाबत  मला पूर्णपणे विश्‍वास आहे. सीबीआयला २० ऑगस्टपर्यंत आरोपींना अटक कर ण्याची डेडलाईन दिली होती. त्यामुळेच त्यांनी माझ्या पतीला या प्रकरणात गोवले आहे, असे शीतल यांनी म्हटले आहे.