सीएसएमटी पूल दूर्घटना: प्राथमिक जबाबदारी कोणाची निश्चित करा; मुख्यमंत्र्यांचा महापालिका आयुक्तांना आदेश

50

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील पूल दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कोणाची हे निश्चित करा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे. याबाबत आज संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्यासंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘ही अतिशय दुर्दैवी दुर्घटना आहे. रुग्णालयात १० जण दाखल असून एक रुग्ण आयसीयूत आहे. मात्र सध्या ते धोक्याबाहेर आहेत. चौकशीचे आदेश तर देण्यात आले आहेतच पण याशिवाय घटनेला प्राथमिक जबाबदार कोण आहे? याबाबत आज संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत’.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरही जर अशी दुर्घटना होत असेल तर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो असे म्हटले. ऑडिट करताना ज्यांनी हिरवा कंदील दाखवला असेल त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे त्यांची पुनर्तपसाणी करावी लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.