सिडको भूखंड घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

75

नागपूर, दि. ५ (पीसीबी) – नवी मुंबईतील सिडकोच्या कथित भूखंड घोटाळा प्रकरणात ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ करण्यासाठी याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरूवार) विधानसभेत केली. यावेळी त्यांनी खोटे आरोप केल्याप्रकरणी विरोधकांनीच राजीनामे देण्याची मागणी केली.  

सिडको भूखंड या घोटाळ्याचे सत्य समोर यावे, यासाठी घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. जमीन व्यवहाराचे अधिकार पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा मंत्र्यांशी किंवा मंत्रालयाशी काहीएक संबंध नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करून मी राजीनामा देणार नाहीच परंतु माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्यांनी अर्धी वस्तुस्थिती मांडली आहे.आता मी पूर्ण सांगतो. रायगड जिल्ह्यात कोयना प्रकल्पग्रस्त ३५ गाव आणि १२ वाडया ७५१ प्रकल्प ग्रस्त आहेत. रायगड जिल्ह्यात ३११ प्रकल्पग्रस्तांना पूर्ण ३१६ अंशत: जमीन दिल्या आहेत. आतापर्यंत पूर्ण बाधितांना ३२० हेक्टर, तर अंशत: बाधितांना २८६ हेक्टर अशी ६०६ हेक्टर जमीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहेत.