सिडकोच्या २४ एकर जमिनीत मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने घोटाळा – संजय निरूपम

27

मुंबई, दि. २ (पीसीबी) – नवी मुंबईत सिडकोच्या २४ एकर जमिनीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने मोठा घोटाळा झाला आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. या घोटाळ्यात मंत्रालयातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा हात आहे. त्याला  फडणवीस कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला.

सिडकोच्या ताब्यातील या जागेची किंमत बाजारभावाप्रमाणे १६०० कोटी रुपये इतकी आहे. मात्र, ती केवळ ३ कोटी रुपयांत बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकली  आहे. बिल्डर भालेराव हे प्रसाद लाड यांचे निकटवृतीय आहेत. तर प्रसाद लाड यांच्या मुख्यमंत्र्यांचे व्यवसायिक सहकारी आहेत. त्यामुळे लाड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांच्या संमतीने हा व्यवहार झाला आहे, असा आरोप निरूपम यांनी केला आहे.

दरम्यान, यासर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रणजीत सुरजेवाला व संजय निरुपम यांनी केली आहे. हा मोठा भ्रष्टाचार असून या प्रकरणाची खुली चौकशी करण्यात यावी. तसेच हा व्यवहार रद्द करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.