सिंधूची पुन्हा उपांत्य फेरीत हार

334

बाली (इंडोनेशिया), दि.२७ (पीसीबी) : भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला पुन्हा एकदा उपांत्य फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत थायलंडच्या रॅटचॅनॉक इंथॅनॉन हिने तिचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असणाऱ्या रॅटचॅनॉक हिने ५४ मिनिटांत सिंधूचा १५-२१, २१-९, २१-१४ असा पराभव केला.

सिंधूला गेल्या आठवड्यात झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतही उपांत्य फेरीत हार पत्करावा लागली होती. त्यापुर्वी ऑक्टोबरमध्ये तिने फ्रेंच ओपन स्पर्धेतही उपांत्य फेरी गाठली होती.

सिंधूने पहिल्या गेमला ८-३ अशी सुरवात केली होती. रॅटचॅनॉक हिने पुढे आघाडी ९-१० अशी कमी केली होती. त्या वेळी सिंधूने सलग तीन गुणांची कमाई केली आणि नंतर मागे वळून बघितले नाही. तिने पहिली गेम सहज जिंकली.

दुसऱ्या गेमला मात्र रॅटचॅनॉकचा पवित्रा काही वेगळाच होता. कमालीच्या आक्रमकतेने खेळताना तिने गेमच्या मध्यापर्यंत (११-७) आपली आघाडी टिकवली होती. गेम १२-८ अशा स्थितीत असताना रॅटचॅनॉक हिने सलग नऊ गुणांची कमाई करताना एक प्रकारे सिंधूचा दर्जा विसरायला लावला. अकरा गेम पॉइंट मिळाल्यावर चालून आलेली वर्चस्वाची संधी कोण सोडणार. रॅटचॅनॉक हिनेही कडक स्मॅश मारत विजीय गुणासह दुसरी गेम जिंकली.

तिसऱ्या गेमलाही चित्र फारसे वेगळे दिसले नाही. रॅटचॅनॉक या वेळी देखिल गेमच्या मध्याला ११-८ अशी आघाडी मिळविली. सिंधूचे क्रॉस कोर्टचे फटके चुकत होते. तिला बॅकलाईनचा अंदाज येत नव्हता आणि फटकेही नेटमध्ये अडकत होते. यामुळे रॅटचॅनॉक हिला वर्चस्व राखण्याची संधी मिळाली. अर्थात, पुढे सिंधूने सलग चार गुणांची कमाई करताना पिछाडी १३-१६ अशी भरून काढली. पण, तिचा हा प्रतिकार तिथेच थांबला. रॅटचॅनॉक हिने गेमसह विजयावर शिक्कामोर्तब केले.