सिंधूचा अपेक्षित विजय

60

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – ऑलिंपिकच्या दुसऱ्या दिवशी सकाली महिला नेमबाजीतील अपयशाची बातमी धडकत असतानाच सुरू झालेल्या बॅडमिंटन लढतीत सिंधूने आपल्या अपेक्षेनुसार खेळ केला. पदकाची अपेक्षा असलेली आणि रियो ऑलिंपिकची रौप्यपदक विजेती सिंधू आज आपला पहिला सामना खेळण्यासाठी जागतिक क्रमवारीत ५८व्या स्थानावर असलेल्या इस्राईलच्या पॉली कारपोव्हा हिच्याविरुद्ध कोर्टात उतरली.

जागितक क्रमवारीत सिंधू सातव्या स्थानावर आहे. एकूणच सिंधूची बाजू आजच्या लढतीत वरचढ होती. अर्थात, ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत पहिली लढत वेगळ्याच कारणासाठी महत्वाची असते. ऑलिंपिकमध्ये खेळताना सुरवातीला मैदानाचा आणि प्रकाशाचा, हॉलमधील वातावरणाचा विशेषतः हवेतील प्रवाह समजून घेण्याच्या दृष्टिने पहिले सामने एकतर्फी असले, तरी त्याचा अंदाज पुढील सामन्यांसाठी अत्यंत उपयोगी पडत असतो.

त्यामुळे बहुतेक खेळाडू अशा सामन्यातून या सर्व गोष्टींची उजळणी करत असतात. सराव करून घेतात. सिंधूने नेमके हेच केले. तिने पॉलिकारपोव्हा हिच्यावर २१-७, २१-१० असा विजय मिळविला. सिंधूने या लढतीत डाव्या बाजूला जाणाऱ्या हवेच्या प्रवाहाचा अंदाज घेतला. सुरवातीच्या ५ गुणांनंतर सिंधू कोर्ट कंडिशन आणि शारिरिक तंदुरुस्तीचा पूर्ण अंदाज घेऊन खेळत होती. असाच परिस्थितीचा अभ्यास करत सिंधूने पॉलिकारपोव्हा हिला सहज पराभूत करून विजयी सलामी दिली.

सिंधूचा पुढील सामना हॉंगकॉंगच्या जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानावर असणाऱ्या एन्गान यी चेंग हिच्याविरुद्ध आहे. ग्रुप जे मधील या सामन्यानंतर सिंधूचा मुख्य स्पर्धेतील प्रवेश नक्की होईल.

WhatsAppShare