सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

52

आळंदी, दि. २५ (पीसीबी) – लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या १८८ व्या पायी वारी सोहळ्याचे आज (मंगळवारी) अलंकापुरीतून सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. इंद्रायणी तिरी वैष्णवांची मांदियाळी जमली होती. भक्तीरसात चिंब झालेल्या वारकऱ्यांनी माऊलींचा पालखी सोहळा ‘याची देही, याची डोळा’अनुभवला.  

ज्ञानोबा तुकोबा… असा अखंड जयघोष, टाळ- मृदंगाचा टिपेला पोहचलेला गजर… वारकऱ्यांनी धरलेला फुगडीचे फेर… हरिनामाचा अखंड निनादणारा आसंमती जयघोष…, भगवी पदका खांद्यावर घेतलेले वारकरी…, तुळसी वृदांवन डोक्यावर घेतलेल्या महिला वारकरी… देहभान हरपून भजनात दंग झालेले भाविक… तल्लीन होऊन नाचणारे भक्तगण… अशा भक्तीमय आणि भारावलेल्या वातावरणात माऊलींचा अनुपम पालखी सोहळा पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाला.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई,  विश्वस्त  डॉ.अजित कुलकर्णी,  अभय टिळक, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या उपस्थितीत आज पहाटे पावणेचार ते  साडेचार वाजण्याच्या सुमारास  घंटानाद , काकडा आरती व पवमान अभिषेक करण्यात आला. महापूजा झाल्यानंतर दुपारी बारापर्यंत भाविकांनी समाधी दर्शन घेतले. त्यानंतर श्रींना नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान प्रस्थान सोहळ्यातील मानाच्या ४७ दिंड्या मंदिरात दाखल झाल्या. चार वाजण्याच्या सुमारास माऊलींना पोशाख चढवून गुरू हैबतबाबा यांच्या वतीने परंपरागत मानाची आरती करण्यात आली. त्यानंतर संस्थानची आरती व मानकऱ्यांना नारळ प्रसाद  वाटप करण्यात आला. वीणा मंडपात ठेवण्यात आलेल्या पालखीत माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या.

संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना मानाच्या पागोट्यांचे वाटप आणि गुरू हैबतबाबांच्या वतीने नारळ प्रसाद देण्यात आला. त्यानंतर आळंदीकरांनी माऊलींची पालखी मंडपाबाहेर आणून मंदिर प्रदक्षिणा करून देऊळवाड्यातून बाहेर आणण्यात आली. खांदेकऱ्यांनी नाचत गात पालखी महाद्वारातून मंदिराबाहेर आणली. ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर समाज आरती होऊन पालखी नवीन दर्शन बारी मंडपात (गांधीवाडा) येथे विसावली.