सावधान! भिशीमध्ये गुंतवणूक करताय? पहा कसा लागला लाखोंचा चुना…

151

चिखली, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात भिशीमधून फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. लिलाव भिशी लावण्याच्या बहाण्याने सभासद करून घेऊन भिशीचे पैसे घेऊन तब्बल 19 लाख 43 हजार 23 रुपये एवढ्या रकमेची फसवणूक केली. हा प्रकार सन 2019 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत मोरेवस्ती, चिखली येथे घडला. दरम्यान, असाच प्रकार काळेवाडी, रहाटणी परिसरात घडला आणि सुमारे ५० लाख रुपयांची शंभरावर नागरिकांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल आहे.

रफिक इसाक तांबोळी (मूळ रा. चंगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी अजिनाथ कापसे (वय 42, रा. चिखली) यांनी गुरुवारी (दि. 23) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मोरेवस्ती चिखली येथे राहत होता. त्यावेळी तो वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या रकमेच्या लिलाव भिशी चालवत होता. त्याने फिर्यादी आणि अन्य काही लोकांना लिलाव भिशीसाठी सभासद करून घेतले. त्यांच्याकडून दर महा भिशीच्या रकमा स्वीकारल्या. त्यानंतर सभासदांना पैसे न देता त्यांची तब्बल 19 लाख 43 हजार 23 रुपयांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare