सावधान….आता नोरोव्हायरसच्या प्रादुर्भावाचा इशारा

217

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – जगभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. अशातच इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसच्या निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. पण, आता नोरोव्हायरसच्या प्रादुर्भावाचा इशारा देण्यात आला आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई)ने देशात अलर्ट जारी केला आहे. नोरोव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस चे प्रस्थ कुठे कमी होते आहे तोच आता नोरोव्हायरसचा प्रादुर्भाव समोर आल्याने जगभरातील लोक संभ्रमात पडले आहेत.

पीएचईनं दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या शेवटापासून पुढच्या पाच आठवड्यांमध्ये इंग्लंडमध्ये नोरोव्हायरसची लागण झालेल्या 154 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 5 वर्षांमध्ये समान काळात नोरोव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये तीन पटींनी वाढ झाली आहे.

नोरोव्हायरस काय आहे ?
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) नुसार, नोरोव्हायरस एक संसर्गजन्य व्हायरस आहे. ज्यामुळे उलट्या आणि मळमळ यांसारखी लक्षणं दिसून येतात. पीएचई याला ‘Winter Vometing Bug’ असं म्हटलं आहे. अत्यंत चिंताजनक गोष्ट म्हणजे, पीएचईनं शैक्षणिक सेटिंग्समध्ये नोरोव्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची सूचना विशेषतः नर्सरी आणि चाइल्ड केअर सुविधांमध्ये दिली आहे.

नोरोव्हायरसची लक्षणं :
नोरोव्हायरसनं इंग्लंडसोबतच जगभरातील इतर देशांची चिंताही वाढवली आहे. सीडीसीनं नोरोव्हायरसची काही मुख्य लक्षण जारी करण्यात आली आहेत. जुलाब, उलट्या, मळमळ होणं आणि पोटाच्या समस्या उद्भवतात. यामुळे पोटाला किंवा आतड्यांना सूजही येते. इतर लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि शरीरामध्ये वेदना होणं यांसारख्या समस्याही उद्भवतात. रुग्णांमध्ये नोरोव्हायरसची लक्षणं दिसण्यास 12 ते 48 तासांचा अवधी लागतो.

नोरोव्हायरसवर उपचार :
या व्हायरसवर सध्या कोणतंही प्रभावी औषध उपलब्ध नाही. विशेषतः या आजारामध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांसाठी वापरली जाणारी औषधं पिण्याचा सल्ला दिला जातो.