सारथी च्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान

16

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : सारथी संस्थेसंदर्भात आज राज्यसरकारमार्फत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु, या बैठकीदरम्यान, मान-अपमानाचं नाट्य रंगलं आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. त्यावरून उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या समन्वयकांनी यासंदर्भात आक्षेप नोंदवला आणि सभेमध्ये गोंधळ झाला. यादरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी सामंजस्याची भूमिका घेत परिस्थिती शांतपणे हाताळली. अशातच या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत बैठकीतील गोंधळ मिटवला.

सारथी संस्थेवरून गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत होते. अशातच अनेक राजकीय नेते या संस्थेवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. आता सारथी संस्थेशी निगडीत मतमतांतराच्या नाट्यामध्ये आता आणखी एक वाद जोडला गेला आहे. आज मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत मान-अपमानाचं नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबाबत एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. गेल्या काही दिवसांपासून मराठा सामाज्याच्या विकासाठी या संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. याच पार्श्वभूमीवरही बैठक बोलावण्यात आली असून बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. तसेच खासदार संभाजीराजे छत्रपतीही या बैठकीला उपस्थित होतं. परंतु, त्यांना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आलं. त्यामुळे सभास्थळी उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या समन्वयकांनी आक्षेप नोंदवत गोंधळ घातला.

संभाजीराजे यांनी आवाहन करुनही त्यांच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातला. यानंतर अजित पवारांनी चूक सुधारत संभाजीराजेंना वरती येण्याचा आग्रह केला. परंतु संभाजी राजे तिसऱ्या ओळीत बसले. त्यांनी कार्यकर्त्यांना न गोंधळ घालण्याचं आवाहन केलं. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करु. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

WhatsAppShare