सामाजिक व धार्मिक एकोपा राखण्यासाठी सर्व राजकीय मंडळींनी एकत्र यावे – शरद पवार

140

धुळे, दि. २ (पीसीबी) – राज्यात सामाजिक व धार्मिक एकोपा राखणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व राजकीय मंडळींनी सर्व प्रकारचे भेद दूर करून एकत्र यायला हवे, असे प्रतिपादन  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार येथे केले. धुळे एक कॉस्मोपॉलिटन शहर आहे. त्यामुळे याची सुरुवात येथूनच होऊ शकते, असेही पवार म्हणाले.

धुळे महापालिकेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान शरद पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, धुळे हे तीन राष्ट्रीय महामार्गावर असलेले भारतातील एक मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचा फायदा धुळे शहर व जिल्ह्यासाठी कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी काही ध्येय-धोरणे, योजना आखता येतील का? याचा विचार करण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

धुळे शहराने महात्मा गांधी, पंडितजी नेहरू, वि. दा. सावरकर, यशवंतराव चव्हाण या थोर नेत्यांना मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. त्याच धुळ्याच्या महापालिकेने आज मला मानपत्र देऊन सन्मानित केले. त्यामुळे मी धुळेकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.