साने चौक पोलीस चौकीसमोर दोन गटात तुंबळ हाणामारी; दहा जणांना अटक

561

चिखली, दि. १४ (पीसीबी) – दारु पिल्याचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन साने चौक पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या गटात आणि विरोधक गटातील २५ ते ३० जणांमध्ये पोलिस चौकीसमोरच तुंबळ हाणामारी झाली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना आज (रविवार) सकाळी दहाच्या सुमारास भिमशक्तीनगर साने चौक पोलीस चौकी समोर घडली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यु.बी.ओमासे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमोल संजय पवार, आशिष ज्ञानेश्वर गवळी, सचिन बाळासाहेब येलकेवाढ, योगेश कैलास कदम, अनिल विठ्ठल खंडागळे, अरुण दौलत पवार, गोरख दशरथ डुकळे, सतिश किसन जाधव, अर्जुन दशरथ पिटेकर आणि संदिप भारत डुकळे या दहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर कैलास गेणबा डुकळे (रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) हा आरोपी अद्याप फरार आहे. या सर्वांविरोधात भा.द.वि.क ३५३,३२३,१४३, १६०, ५०४ आणि महाराष्ट्र पोलीस अॅक्ट १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दारु पिण्याच्या कारणावरुन २५ ते ३० जणांच्या दोन गटात भांडण झाले होते. आज सकाळी दहाच्या सुमारास दोनही गटातील लोक हे साने चौक पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. यादरम्यान पोलिस चौकीच्या आवारात आणि समोरील रस्त्यावर या गटात तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी मध्यस्ती केली असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. तसेच जमाव बंदीच्या आदेशाचा भंग करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी वरील दहा जणांना अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, भिमशक्तीनगर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दारु, मटका, ताडी आणि जुगाराचे अनअधिकृत अड्डे असल्याने येथे महिलांची छेडछाडाचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच या अड्ड्यांमुळे येथे वारंवार भांडण देखील होतात. त्यामुळे स्त्रीया आणि मुले या ठिकाणी सुरक्षीत नाहीत. यामुळे येथील दारु, मटका, ताडी आणि जुगाराचे अड्डे बंद करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

WhatsAppShare