सात राज्यात नवे राज्यपाल; सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचाही कार्यकाळ संपुष्टात

599

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – मोदी सरकारने तीन राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे, तर चार राज्यांतील राज्यपाल बदलले आहेत. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी गंगाप्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   

जुलै २०१३ मध्ये श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमचे राज्यपालपदी नियुक्ती झाली  होती. श्रीनिवास पाटील यांच्यासोबत काश्मीरचे राज्यपाल एन एन वोरा यांचाही कार्यकाळ संपुष्टात येत आहे. एन एन वोरा २००८ पासून जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदावर कार्यरत आहेत. वोरा यांच्या जागी बिहारचे सध्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची काश्मीरचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.

तर भाजपचे वरिष्ठ नेते लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. बिहारचे माजी मंत्री सत्यदेव नारायण आर्य यांची हरयाणाच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. तर हरयाणाचे सध्याचे राज्यपाल कॅप्टन सिंह सोलंकी यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. बेबी राणी मौर्या यांना उत्तराखंडच्या राज्यपालपदी नेमणूक केली आहे. तथागत रॉय यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून तर गंगाप्रसाद यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.