साताऱ्यात अडीच हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल

179

सातारा, दि. २६ (पीसीबी) – साताऱ्यातील मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलनानंतर महामार्ग रोखून जाळपोळ, तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अडीच हजार जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी फौजदार नानासाहेब कदम यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साताऱ्यात अचानक महामार्ग रोखण्यावरुन हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाचे हे लोण एवढे आक्रमक बनले की अचानक विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील सर्व भाग, नटराज मंदिर परिसरात आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत सातारा जिल्हा पोलिस दलातील अधिकार्‍यांसह तब्बल ३२ कर्मचारी जखमी झाले. दुपारी तीन नंतर अखेर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या जमावाला काबू करण्यास सुरुवात करुन धरपकड मोहीम राबविली. रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी सुमारे ७० जणांना ताब्यात घेतले होते. याशिवाय पोलिसांनी केलेले, शुटींग फोटो याची खातरजमा केली असता त्यातून आणखी अनेकांची नावे समोर आली असून यामध्ये सुमारे अडीच हजार जणांचा समावेश असल्याचे पोलिसांचे तक्रारीत म्हणणे आहे.