साताऱ्याच्या खासदारांना सर्वपक्षीयांनी बिनविरोध निवडून दिले पाहिजे – दिवाकर रावते   

1713

सातारा, दि. ३० (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज  यांचे वंशज असलेल्या साताऱ्याचे खासदार  उदयनराजे भोसले यांना सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन  बिनविरोध निवडून दिले पाहिजे. मात्र, त्यांच्या ऐवजी आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या नाव पुढे करून त्यांना बेवारस करण्याचा प्रयत्न सुरू आहे,  असा आरोप राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला.

साताऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी रावते बोलताना  म्हणाले की,  शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून काही जण  पदाला चिटकलेले आहेत. मात्र, आता परिस्थिती बदलेली आहे, त्यामुळे त्यांनी  नव्या कार्यकर्त्याना  संधी देणे आवश्यक आहे.

शिवसेनेने लोकसभा व विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली  आहे. मोदींच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व विरोधकांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, शिवसेना  त्यांच्या मागे लागलेली नाही. शिवसेना  स्वबळावर निवडणूकांना सामोरी जाईल, असे ते म्हणाले.