साडेसहा तासांनी जुना मुंबई-पुणे महामार्ग सुरू  

100

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (गुरूवार) महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी तळेगावजवळील उर्से टोलनाक्यावर सकाळी साडेदहा वाजल्यापासून जुना मुंबई -पुणे महामार्ग रोखला होता. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही मार्गाची वाहतूक दोन्ही दिशेने ठप्प झाली होती. अखेर साडेसहा तासांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खुला झाला. वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (गुरूवार) क्रांती दिनी महाराष्ट्र बंद पुकाराला. या पार्श्वभूमीवर उर्से टोला नाका येथे मराठा आंदोलकांनी जुना मुंबई-पुणे महामार्ग सकाळी ११ वाजता रोखून धरला होता.  यावेळी आंदोलकांनी जोर जोरात घोषणाबाजी केली. तर खबरदारी म्हणून पोलिसांनी येथे सकाळपासूनच बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.

दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहतूक तुरळक सुरू होती. त्यामुळे महामार्ग रोखल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही. आज सकाळपासूनच महामार्गावर शुकशुकाट दिसून येत होता. अपवाद सोडल्यास तुरळक वाहतूक सुरू होती. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, कंपन्या, कार्यालये यांना आज (गुरूवारी) सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर न पडता घरी थांबणे पसंत केले आहे. काही मार्गावरील पीएमपी बसच्या फेऱ्या रद्द् करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र बंदमुळे आज वाहनांची संख्या तुरळक असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली नाही.  परंतु दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. पोलिस दिवसभर आंदोलकांना हटवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते. अखेर साडेसहा तासांनंतर सायंकाळी पाचच्या सुमारास महामार्ग सुरू  झाला.