साडीच्या झोपाळ्याचा फास गळ्याभोवती आवळल्याने १२  वर्षांच्या मुलाचा मृत्यू

280

नालासोपारा, दि. ६ (पीसीबी) – साडीपासून तयार करण्यात आलेल्या झोपाळ्याचा फास गळ्याभोवती आवळला गेल्याने एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार (दि.५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नालासोपारा पूर्वेकडील बटरपाडा येथे घडली.

राकेश (वय १२) असे मयत मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राकेश शाळेतून घरी परतला होता. घरी परतल्यावर तो झोपाळ्यावर खेळत होता. खेळता खेळता झोपाळ्याचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळला गेल्याने, त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा घरात कोणीही नव्हते. राकेशचे वडिल कामासाठी बाहेर गेले होते. तर राकेशची आई घरातले आवश्यक सामान आणण्यासाठी बाहेर गेली होती. राकेशची दोन भावंडं शाळेतून परतायची होती. राकेशला झोपाळ्याचा फास आवळला गेल्याचे शेजाऱ्यांना काही वेळाने लक्षात आले. त्यांनी तातडीने राकेशला रूग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.