साई स्पोर्टस संघाला विजेतेपद

0
609

पुणे, दि.२७ (पीसीबी) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथ्या खेलो इंडिया जिल्हा स्तरीय १८ वर्षांखालील कबड्डी स्पर्धेत साई स्पोर्ट्स अकादमी संघाने विजेतेपद पटकावले. जिल्हा संघटनेच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साई स्पोर्टसने कळंबच्या महाराणा प्रताप संघाचा प्रतिकार ३३-३० असा तीन गुणांनी मोडून काढला.

विश्रांतीला असलेली १८-११ अशी सात गुणांची आघाडी साई स्पोर्टसला वाढवता आली नाही. उत्तरार्धात त्यांचा प्रमुख खेळाडू अजित चौहानची कोंडी करण्यात महाराणाच्या खेळाडूंना यश आले होते. त्यानंतरही ते आपल्या खेळावर नियंत्रण ठेवू शकले नाही. त्यांच्या बचावपटूंनी केलेली घाई त्यांना महागात पडली. साईकडून अजित चौहानच्या चढाया विशेष ठरल्या. त्याला सूरज चौधरी आणि गोपाळ चौधरी यांची साथ मिळाली. पराभूत संघाकडून पृथ्वीराज शिंदे, वैभव रबाडे, तुषार बर्गे यांचा खेळ उल्लेखनीय ठरला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, शरद अण्णा चव्हाण, क्रीडा उपसंचालक श्रीमती प्रमोदिनी अमृतवाड, छत्रपती पुरस्कार विजेती शोभा भगत, राष्ट्रीय खेळाडू शमा शिंदे आदि मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

पुणे जिल्हा संघटनेच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा अधिकारी आणि महाराणा प्रताप संघाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी, शिल्पा चाबुकस्वार, जिल्हा संघटनेचे राजेंद्र आंदेकर, संदीप पायगुडे, इम्रान शेख, राजेंद्र ढमढेरे उपस्थित होते.