सांगवी पोलिसांनी बलात्कार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या

297

पुणे, दि. २३ (पीसीबी) – बलात्कार आणि पास्कोच्या गुन्ह्यात सांगवी पोलिसांनी अटक केलेल्या एका गुन्हेगाराने येरवडा कारागृहात गळफास घेत आत्महत्या केली. हा घटना शनिवारी (दि.२२) सकाळच्या सुमारास टिळक यार्डमधील ७ नंबरच्या खोलीतून उघडकीस आली.

नरसिंग शेषराव सूर्यवंशी (४३, लातूर) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सूर्यवंशी हा सांगवी पोलिस ठाण्याकडील बलात्कार आणि पास्कोच्या गुन्ह्यातील आरोपी होता. शनिवारी कारागृहात केशकर्तनाचा दिवस असतो. यामुळे सूर्यवंशी आणि त्याच्या खोलीतील दोन आरोपी केशकर्तनासाठी खोलीबाहेर होते. केशकर्तन करण्यासाठी गर्दी असल्याने सूर्यवंशी हा एकटाच खोलीत परत आला. त्याने अंडरवेअरच्या इलास्टिकच्या साहाय्याने खिळ्याला गळफास लावला. त्याने फाशी  घेतल्यानंतर आरडाओरड केली, तेव्हा त्याच्या इतर खोलीतील आरोपी आत आले. त्याला तातडीने खाली घेतले. कारागृहातील रुग्णालयात नेण्यात आले. तेथून प्राथमिक उपचार करून ससून रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आत्महत्येची नोंद येरवडा पोलिस ठाण्यात करण्यात आली.