सांगवीत शाळकरी मुलीचा भीषण अपघात; बसच्या चाकाखाली हात चिरडला

488

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – शाळा सुटल्यानंतर सायकलवरुन घरी निघालेल्या एका शाळकरी मुलीला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने ती खाली पडली. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या एका बसचे चाक मुलीच्या हातावरुन गेले यामध्ये मुलीचा हात फ्रॅक्चर झाला. हा थरारक अपघात मंगळवारी (दि.११) शितोळेनगरमधील सिध्दी विनायक वडापावच्या दुकाना समोरील रस्त्यावर घडला.

सौम्या असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे. याप्रकरणी श्रीकांत रामविशाल मित्रा (वय ३५, रा. आदर्शनगर, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस  ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  जखमी सौम्या ही खडकी येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेत आहे. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास शाळा सुटल्यावर ती तिच्या सायकलवरून नवी सांगवी आदर्शनगर येथील तिच्या घरी निघाली होती. सौम्या शितोळेनगरमधील सिध्दी विनायक वडापावच्या दुकाना समोरील रस्त्यावर आली असता एका अज्ञात दुचाकीस्वाराने तिला जोरदार धडक दिली. यामुळे सोम्या रस्त्यावरच पडली. यादरम्यान गणपती चौकाकडून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या आयशर कंपनीच्या मिनी बसचे मागील चाक सोम्या हिच्या उजव्या हातावरुन गेले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली असून तिचा हात फ्रॅक्चर झाला आहे. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून सांगवी पोलीस दुचाकीस्वाराचा तपास करत आहेत.