सांगवीत दुचाकीस्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत महिला गंभीर जखमी

273

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – रस्त्यावर मैत्रिणींसोबत बोलत उभ्या असलेल्या एका ५५ वर्षीय महिलेला भरधाव दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना सोमवारी (दि. १०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शितोळे नगर, जुनी सांगवी येथे घडली.

अन्नपूर्णा बाळासाहेब गोडसे (वय ५५, रा. शितोळे नगर, जुनी सांगवी) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रतिभा देवानंद भोळे (वय ३२, रा. मदने चाळ, फडतरे वॉशिंग सेंटर जवळ, शितोळे नगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अन्नपूर्णा  या त्यांच्या मैत्रिणींसोबत सांगवी चौपाटीकडून मुख्य रस्त्याच्या बाजूला फडतरे वॉशिंग सेंटर जवळील रस्त्यावर गप्पा मारत उभ्या होत्या. त्यावेळी अचानक भरधाव वेगाने आलेल्या एक अॅक्टिवा (एमएच/१४ / जीजी/१६२०) या दुचाकीस्वार तरुणाने अन्नपूर्णा यांना जोरदार धडक दिली आणि दुचाकीसह पसार झाला. या अपघातामध्ये अन्नपूर्णा यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला तसेच दोन्ही डोळ्यांच्या भूवयांवर गंभीर जखम झाली. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांगवी पोलीस आरोपी दुचाकीस्वाराच शोध घेत आहेत.