सांगवीत चोरांना चोरी करण्यापासून थांबवल्याने इसमाला जबर मारहाण

257

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) –  चोरी करण्यासाठी आलेल्या तिघा चोरांपैकी दोघांना पकडून ठेवले असता एकाने त्यांना सोडवून ४५ वर्षीय इसमाला जबर मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.५) रात्री दोनच्या सुमारास जुनी सांगवीतील महादेव मंदिरा जवळील फ्लॅट क्र.२६, ए-विंग, तिसरा मजला येथे घडली.

राजेश टाले (वय ४५, रा. जुनी सांगवी) असे चोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या इसमाने नाव आहे. याप्रकरणी त्याने तीन अनोळखी इसमांविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी फिर्यादी टाले हे सांगवीतील महादेव मंदिरा जवळील फ्लॅट क्र.२६, ए-विंग, तिसरा मजला येथेच राहतात. रविवारी रात्री उशीरा दोनच्या सुमारास फिर्यादी यांच्या ओळखीचे होनप्पा तिम्मन्ना कोळी यांचे घर बंद असताना तिन चोर त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. ही बाब शेजारी राहणाऱ्या टाले यांना समजली त्यांनी चोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यातील दोघांना त्यांनी पकडून ठेवले होते. यावेळी एका चोराने त्यांच्या डोक्यात जड वस्तूने मारहाण केली. यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि तिघे आरोपी पसार झाले. टाले यांनी सांगवीत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.