सांगलीतील चौगुले हॉस्पिटलमध्ये सुरु असलेल्या गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश

151

सांगली, दि. १६ (पीसीबी) – अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी सांगलीतील चौगुले हॉस्पिटल सील करण्यात आले असून, तेथील तीन डॉक्टरांवर गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आणि महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने संयुक्तरित्या धाड टाकून हे प्रकरण उघडकीस आणले.

स्वप्नील जगवीर जमदाडे, विजयकुमार शामराव चौगुले, रुपाली विजयकुमार चौगुले या तीन डॉक्टरांवर गर्भपात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीतील चौगुले हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात सुरु असल्याची खात्रीशिर माहिती पोलिसांना आणि सांगली महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार  पोलिस आणि महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने संयुक्तरित्या चौगुले हॉस्पिटलवर धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी हॉस्पिटलमधून संशयास्पद कागदपत्रे, औषधे गर्भपाताची सामग्री ताब्यात घेतली आहे. तसेच हॉस्पीटलमध्ये गर्भपाताचे किट आणि दारुच्या बाटल्याही सापडल्या. पोलिसांनी हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ठिकाणी सहा गर्भपात झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौगुले हॉस्पिटल मधील स्वप्नील जगवीर जमदाडे, विजयकुमार शामराव चौगुले, रुपाली विजयकुमार चौगुले या तीन डॉक्टरांवर गर्भपात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.