सलमान, राज, आदित्य, रावते, अजित पवारांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड

1214

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी  दंड न भरणाऱ्यांच्या यादीत अभिनेता सलमान खान ,मनसेप्रमुख राज ठाकरे, युवासेना नेते आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे असल्याची धक्कादायक  माहिती समोर आली आहे.

सिग्नल तोडणे, नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे ,झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करणे, अशा किरकोळ गुन्ह्यांसाठी  वाहतूक विभागाकडून  दंड आकारला जातो. मात्र,  मुंबईत हा दंड इतर शहरांप्रमाणे रस्त्यावर  वाहतूक  पोलीस वसूल करत नाहीत. तर  नियम तोडणाऱ्या वाहनांच्या मालकांना दंडाचे ई-चलान  पाठवून दिले जाते. त्या ई-चलाननुसार वाहनांच्या मालकांना ऑनलाइन दंड भरावा लागतो.  गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही ई-चलान पद्धती सुरू झाली होती.

मुंबईत ई-चलान पाठवलेल्यांपैकी बहुतांश लोकांनी दंड भरलाच नसून ११९ कोटी रुपये रकमेचा दंड थकीत आहे. हा दंड न भरणाऱ्यांच्या यादीत अभिनेता सलमान खान, आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रवक्ते राम कदम, मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही या यादीत नावे आहेत. दरम्यान, ई चलान भरण्यासाठी कोणीही सक्ती करण्यात येत नाही. त्यामुळे अनेक वाहनधारक हे दंड भरत नसल्याचे समोर आले आहे.