सर्व गरिबांसाठी ५० हजाराचे पॅकज द्या – फडणवीस

76

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : शेतकरी, असंघटित कामगार, रिक्षाचालक, मजूर, बारा बलुतेदार अशा प्रकारच्या सर्व गरिबांसाठी 50 हजार कोटी रुपयांचं पॅकेज द्यावं. केंद्राने जीडीपीच्या 5 टक्के कर्ज घेण्याची परवानगी राज्याला दिली आहे, केंद्राच्या गॅरंटीवर महाराष्ट्राला एक लाख 60 हजार कोटी रुपये मिळू शकतात, असं गणित विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. ठाकरे सरकारविरोधात भाजपने मेरा अंगण मेरा रणांगण, असं म्हणत महाराष्ट्र बचावचा नारा दिला. यावेळी फडणवीसांनी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर अंगणात आंदोलन केलं.

केंद्राने 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरुन काम करतंय. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही, केंद्राने 468 कोटी दिले, याशिवाय 1600 कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले, असा दावा फडणवीसांनी केला.

केंद्राचे पैसे राज्य सरकार खर्च करत नाही, रेशनही केंद्राने पुरवले, आता खरिपाचा हंगाम आहे, शेतकऱ्यांना जी मदत हवी, त्याबद्दल काही पावलं उचलली नाहीत, अजूनही कापूस घरी आहे, पीकं पडून आहेत, शेत माल उचलला नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. ज्या पिकांची खरेदी होते त्याचे पैसे केंद्र देते, पण राज्याने ती खरेदी करायची असते, पण ते कामही राज्य करत नाही, केंद्राने राज्याला पैसेही दिले आहेत. मजूर, बारा बलुतेदार संकटात आहेत, त्यांना कोणतीही मदत राज्य सरकारने केलेली नाही, अशी टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली.

असंघटीत कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याबाबत निर्णय घ्यायला हवा, कोरोनाचे उपचार मोफत व्हायला हवेत, खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन सर्वांवर मोफत उपचार व्हावे. शेतकरी, असंघटित कामगार, रिक्षाचालक, मजूर, बारा बलुतेदार अशा प्रकारच्या सर्व गरिबांसाठी 50 हजार कोटी रुपयांचं पॅकेज द्यावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली.

केंद्राने जीडीपीच्या 5 टक्के कर्ज घेण्याची परवानगी राज्याला दिली आहे, केंद्राच्या गॅरंटीवर महाराष्ट्राला एक लाख 60 हजार कोटी रुपये मिळू शकतात, जीएसटीच्या रुपाने तो आपल्याला परतावा करता येईल. ही सगळी सोय असताना, राज्य सरकार पावलं उचलत नाहीत, ओदिशासारख्या राज्यांनी केलं, महाराष्ट्र सरकार केवळ केंद्राकडे बोट दाखवून रडत बसतंय, ही रडण्याची नाही तर लढण्याची वेळ आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

WhatsAppShare