सराईत वाहन चोरट्यास भोसरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तब्बल एक कोटी एक लाखाचा मुद्देमाल जप्त

60

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – भोसरी पोलिसांनी एका सराईत वाहन चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून 22 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरीच्या दुचाकी खरेदी करणा-या आणि त्याची वाहतूक करणाऱ्या चौघांवर कारवाई करत तीन ट्रॅव्हल्स देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या कारवाईमध्ये एकूण एक कोटी एक लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यामुळे 14 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सुनिल वामन महाजन (वय 52, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे अटक केलेल्या सराईत वाहन चोराचे नाव आहे.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार भोसरी पोलीस तपास करत होते. एका वाहन चोरीच्या गुन्ह्यात भोसरी पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत होते. त्यामध्ये दिसणारा संशयित व्यक्ती बाबर पेट्रोल पंपामागील पार्किंग मध्ये येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी आरोपी सुनील महाजन याला ताब्यात घेतले. त्याने वाहन चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास अटक करून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान आरोपी सुनील महाजन याने भोसरी, पिंपरी, निगडी परिसरातून 22 दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. त्यातील बारा दुचाकी भोसरी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पार्क केल्याचे आरोपीने सांगितले. पोलिसांनी या बारा दुचाकी वेगवेगळ्या ठिकाणाहून जप्त केल्या.

तसेच आरोपीने दहा दुचाकी ट्रॅव्हल वरील चालक राजेश विश्‍वनाथ महाजन (वय 38), सुपडू बोंदर ठाकणे (वय 34), संतोष नामदेव महाजन (वय 39), निलेश जनार्दन ढगे (वय 37, सर्व रा. जळगाव) यांना दिल्याचे सांगितले. पोलिसांनी या ट्रॅव्हल्स चालकांशी संपर्क केला. ट्रॅव्हल्स चालकांनी आरोपीकडून घेतलेल्या दुचाकी पोलीस ठाण्यात हजर केल्या.

ट्रॅव्हल्स चालकांनी चोरीच्या दुचाकी खरेदी केल्याबाबत भोसरी पोलिसांनी चार जणांवर कायदेशीर कारवाई केली. तसेच चोरीच्या दुचाकी घेऊन जाण्यासाठी वापरलेल्या देवांशी, संगीतम आणि स्वामीनारायण या नावाच्या तीन ट्रॅव्हल्स जप्त केल्या. या कारवाईमध्ये भोसरी पोलिसांनी एकूण एक कोटी एक लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील पाच, पिंपरी पोलीस ठाण्यातील सात, निगडी पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भवारी, पोलीस अंमलदार गणेश हिंगे, सुमित देवकर, विनोद वीर, समीर रासकर, गणेश सावंत, संतोष महाडिक, जाधव यांच्या पथकाने केली.

WhatsAppShare