सराईत चोरट्याला अटक करुन सव्वापाच लाखांचे दागिने जप्त

206

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – वाकड, सांगवी आणि वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. या आरोपीच्या घरातून पोलिसांनी तब्बल ५ लाख १३ हजार ६४५ रुपये किमतीचे १५५.६५ ग्रॅम वजनी सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.   

सुनिल मल्हारी तलवारे (वय २८, रा. रेल्वे स्टेशनजवळ, धिरज सातकर यांच्या खोलीत, कान्हे फाटा, वडगाव मावळ) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण पाच घरफोडी प्रकरणाचे गुन्हे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाला माहिती मिळाली होती कि, वाकड, सांगवी आणि वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या करणारा एका सराईत चोरटा कान्हे फाटा येथे भाड्याच्या खोलीत परिवारासह राहत आहे. यावर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून सुनिल याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता तब्बल ५ लाख १३ हजार ६४५ रुपये किमतीचे १५५.६५ ग्रॅम वजनी सोन्याचे दागिने आढळुन आले. पोलिसांनी ते जप्त केले आहेत. सुनिलची कसून चौकशी केली असता त्याने वाकड पोलीस ठाणे हद्दीत तीन, सांगवी आणि वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी असे एकुण पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली. सुनिल याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी लक्ष्मण आढारी, नारायण जाधव, प्रवीण दळे, संजय गवारे, हजरत पठाण, मोहम्मद गौस नदाफ, फारुख मुल्ला, संदीप ठाकरे, दत्तात्रय बनसुडे, तुषार शेटे, नितीन बहिरट, मयूर वाडकर, राहुल खारगे, किरण आरुटे, धर्मराज आवटे, धनराज किरनाळे, चेतन मुंडे यांच्या पथकाने केली.