सराईत गुन्हेगार सुमित माने टोळीवर मोक्काची कारवाई

55

वाकड, दि. 18 (पीसीबी):
वाकड परिसरात बेकायदा जमाव जमवून मारहाण करणे, बेकायदा जमाव जमवून खूनाचा प्रयत्न करून खंडणी उकळणे, दरोडा घालणे असे गंभीर गुन्हे करून वर्चस्वासाठी टोळी निर्माण केलेल्या सराईत गुन्हेगार सुमित माने टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी (दि. 18) दिले आहेत.
टोळी प्रमुख सुमित सिद्राम माने (वय 21, रा. ड्रायव्हर कॉलनी, काळेवाडी फाटा, वाकड, पुणे), अभिषेक भाऊसाहेब रोडे (वय 18, रा. श्रमिक कॉलनी, दत्तनगर, थेरगांव, पुणे), मारुती केरनाथ देढे (वय 20, रा. गजानन मेडीकल समोर, कस्पटे वस्ती, वाकड, पुणे), सुरज हरीभाऊ तिकोणे (वय 25, रा. सोनाई कॉलनी, दत्तनगर, थेरगांव, पुणे), पवन भारत बलवंते (वय 19, रा. गणपती मंदिरा जवळ वाकड, पुणे), जीवन त्रिभुवन (रा. कैलासनगर, पिंपरी पुणे), भावेश (पूर्ण नाव पत्ता नाही) आणि तीन अल्पवयीन मुलांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगार सुमित माने आणि त्याचे अन्य साथीदार यांच्या विरोधात बेकायदा जमाव जमवून मारहाण करणे, बेकायदा जमाव जमवून खूनाचा प्रयत्न करून खंडणी उकळणे, दरोडा घालणे असे तीन गुन्हे वाकड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. हे आरोपी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वाकड पोलिसांनी अपर पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता. त्यावर शिक्कामोर्तब करत अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे पोलीस उप-आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.सी.बी. गुन्हे शाखा (अतिरीक्त कार्यभार) डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, सुहास पाटोळे यांच्या पथकाने केली.

WhatsAppShare