सरकार लोकशाही मार्गानेच उलथवतात; शिवसेनेचा भाजपला टोला   

182

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – नक्षलवाद्यांनी भाजप सरकार उलथवण्याचा कट रचला आहे, सरकारचे हे विधानच मूर्खपणाचे आहे. तुमचे सरकार कोण उलथवणार ?, मनमोहन सिंग यांचे सरकार नक्षलवाद्यांनी नव्हे, तर जनतेने उलथावून लावले होते.  सरकार लोकशाही मार्गानेच उलथवली जातात,  अशा शब्दांत शिवसेनेने भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्यासह देशातील विविध भागांमधून पाच जणांना अटक केली आहे. नक्षलवाद्यांनी भाजप सरकार उलथवण्याचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ‘सामना’ या मुखपत्राच्या अग्रलेखातून टीका केली आहे.

पंतप्रधान मोदी यांची सुरक्षा जगात ‘लय भारी’ असून त्यांच्या डोक्यावरून चिमणीही उडू शकत नाही. सरकारे उलथवून टाकण्याइतपत क्षमता या माओवाद्यांमध्ये असती तर पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मणिपूरमधील सरकारे त्यांनी गमावली नसती. त्यामुळे पोलिसांनी जिभेवर लगाम ठेवून कामे करावीत, नाहीतर मोदी व त्यांच्या भाजपचे नव्याने हसे होईल, असा सल्लाही शिवसेनेने दिला.