सय्यद मतीनचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर

4553

औरंगाबाद, दि. १९ (पीसीबी) –  भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम पक्षाचे सय्यद मतीन याचे नगरसेवकपद कायमचे रद्द करण्यात यावे, असा ठराव औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

हा प्रस्ताव  महापालिका आयुक्त  सोमवारी (दि.२०) सरकारकडे पाठविणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मतीनचे सभागृहातील फोटो आणि भाषणाचे व्हिडीओ देखील सरकारला देण्यात येणार असल्याचे समजते.

महापालिकेची शुक्रवारी (दि.१७) सर्वसाधारण सभा होती. यावेळी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजलीचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावास एमआयएमचे नगरसेवक मतीन याने वादग्रस्त विधान करून विरोध दर्शवला. त्यामुळे सभागृहात भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतीन याची चांगलीच धुलाई केली.

उपमहापौर विजय औताडे यांनी मतीन याचे नगरसेवकपद कायम रद्द करण्याचा  प्रस्ताव मांडला. त्यास  सभागृह नेता विकास जैन, राजू वैद्य, प्रमोद राठोड, राज वानखेडे, माधुरी अदवंत, गजाजन बारवाल, रामेश्वर भादवे यांनी अनुमोदन दिले.