समुद्राच्या तळाशी साखरेचा साठा ? संशोधकांचा दावा

155

बर्लिन,दि.२८(पीसीबी) – जर्मनीमधील मॅक्स प्लॅंक इन्स्टिट्यूट ऑफ मरीन मायक्रोबायोलॉजीमधील संशोधकांनी सागर तळाशी केलेल्या पाहणी मध्ये गवताखाली साखरेचे डोंगर आढळून आले आहेत. वातावरणातील कार्बन शोषून घेणारी ही जगातील सर्वांत मोठी इकोसिस्टिम असल्याची माहिती संशोधकांनी दिली.

साधारणपणे एका किलोमीटर एवढ्या भागामध्ये असलेले सागरी गवत हे कित्येक मैल अंतरावर पसरलेल्या जंगलापेक्षाही अधिक कार्बन शोषून घेते. ही सगळी प्रक्रिया साधारणपणे ३५ पट अधिक वेगाने होते असे संशोधकांनी म्हटले आहे. या समुद्री गवताच्या मुळाशी असलेल्या मातीची पाहणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर आढळून आली. याआधीही संशोकांनी या साखरेचे प्रमाण मोजण्याचा प्रयत्न केला होता पण आता नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासाअंती हे प्रमाण ८० पटींनी अधिक असल्याचे आढळून आले आहे. तुलनाच करायची झाली तर समुद्राच्या तळी असणाऱ्या साखरेचे प्रमाण हे कोकच्या ३२ अब्ज कॅनमध्ये जेवढी साखर असते तेवढेच असते असे म्हणता येईल. सध्या ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणामध्ये होत असलेल्या बदलांचा सर्वांत मोठा धोका या समुद्र तळाशी आढळून येणाऱ्या गवताला आहे. जगातील विविध सागरी भागांमध्ये या गवताचे प्रमाण कमी होऊ लागले असून यावरून अनेक तज्ज्ञांनी सावधगिरीचाही इशारा दिला आहे.

या शोधपथकाचे प्रमुख मॅन्यूएल लाईबेके यांनी सांगितले की, समुद्राच्या तळाशी असणारी कुरणे ही नष्ट झाल्याने त्याचा थेट विपरीत परिणाम हा वातावरणावर होईल. यामुळे एक तर प्रदूषण अधिक वाढेल आणि त्याचबरोबर या कुरणांनी जेवढा कार्बन शोषून घेतला आहे तेवढा वातावरणामध्ये मिसळेल. हे प्रमाण साधारणपणे १.५४ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड एवढे आहे. एका वर्षामध्ये ३ लाख ३० हजार कारमुळे जेवढा कार्बनडाय ऑक्साईड निर्माण होतो. तेवढा यामुळे वातावरणामध्ये मिसळेल.