समाजवादी पक्षामध्ये काका-पुतण्यामधील संघर्ष पुन्हा उफाळला

157

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष  मुलायमसिंह यादव यांचे बंधू शिवपाल यादव आणि मुलायमसिंहाचे चिरंजीव अखिलेश यादव यांच्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अखिलेश यादव यांनी डावलल्याचा आरोप करत शिवपाल यादव यांनी समाजवादी सेक्यूलर मोर्चाची स्थापना केली आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षालाच फटका बसण्याची शक्यता आहे.  

अखिलेश यादव यांनी मला आणि माझ्या समर्थकांना डावलल्याचा आरोप  शिवपाल यादव यांनी केला  आहे. पक्षनेतृत्वाकडून डावलल्या जाणाऱ्या वर्गाला आणि जातीला आम्ही आमच्या मोर्चात स्थान देऊ. याद्वारे आम्ही पक्षबांधणीच करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. इतर छोट्या पक्षांशीही आम्ही संपर्क साधू असेही त्यांनी म्हटले आहे.

शिवपाल यादव म्हणाले की, आमचे मत जाणून घेतले जात नाही. आम्हाला पक्ष बैठकीत बोलावले जात नाही, पक्षाचे कामही दिले जात नाही. म्हणून शेवटी सेक्यूलर मोर्चाची स्थापना करण्याच निर्णय घेतला. दरम्यान, शिवपाल यादव यांना पक्षात महत्त्वाचे पद दिले जाणार होते. मात्र, शिवपाल यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही स्थान देण्यात आलेले नाही, त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.