‘सब घोडे बारा टके’ घेऊन भाजपने विजय मिळवला – उद्धव ठाकरे

627

जळगाव, दि. ६ (पीसीबी) – सांगली महापालिका निवडणूक निकालावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपावर तिखट शब्दांत टीका केली आहे. सरकारविरुद्ध जनतेत इतका रोष, नाराजी असताना भाजप सांगली-जळगावमध्ये जिंकला. ही तर २०१९ च्या भाजपच्या विजयाची नांदी आहे असे शंख फुंकले जातच आहेत. मग ही जर भाजपवाल्यांना त्यांच्या विजयाची नांदी वाटत असेल तर मध्यंतरी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत जे घडले त्याला काय म्हणायचे? असा सवाल विचारत चंद्रकांतदादा, जरा जपून! असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

भारतीय जनता पक्ष चारेक वर्षांपासून विजयाचे चौकार – षटकार ठोकीत आहे. असे चौकार – षटकार पन्नास वर्षे काँग्रेसही ठोकीत होतीच. काँग्रेसच्या विजयावरही तेव्हा शंकाकुशंका घेतल्याच जात होत्या. सांगली विजयाचे शिल्पकार आणि राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता खिल्ली उडवत असे सांगितले आहे की, सांगली महापालिकेत दारुण पराभव झाल्यानंतरही विरोधकांनी अद्याप ‘ईव्हीएम’ घोळाचा आरोप कसा केला नाही याचेच आश्चर्य वाटते. चंद्रकांतदादा यांना आश्चर्य वाटणे साहजिक आहे, पण मतदान यंत्र घोळाचे आरोप दहा वर्षांपूर्वी प्रथम भाजपकडूनच झाले होते हे ते विसरलेले दिसतात अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली आहे.

सांगलीत काय किंवा जळगावात काय, निवडणुकीपूर्वी घाऊक पक्षांतरे भाजपने करून घेतली. जे विजयी झाले ते भाजपचे पूर्वाश्रमीचे विरोधकच आहेत व याच मंडळींनी सांगली किंवा जळगावसारख्या शहरांची वाट लावली अशी बोंब पूर्वी भाजप मारीत होता. मात्र आता हेच ‘वाटमारे’ भाजपचे बहुसंख्य उमेदवार बनले व विजयी झाले. यावर आपल्या चंद्रकांतदादांचे म्हणणे असे की, राजकारणात हे असे पक्षबदल होतच असतात, पण त्यांच्या पक्षबदलास जनता मान्यता देते का हे महत्त्वाचे आहे. उद्या याच विचाराने भाजपने छिंद्रमला पुन्हा कवटाळले व जिंकणारा उमेदवार म्हणून तिकीट दिले तरी आश्चर्य वाटायला नको असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.