“सब कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्वात मोठा झोल, सर्व नियम गुंडाळून सब-सब कॉन्ट्रॅक्ट”

141

– स्मार्ट सिटी तील एल. एन्ड टी. कंपनी कामाबाबतच्या सुनावणीत जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी उघड केला प्रचंड मोठा घोटाळा

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – स्मार्ट सिटी अंतर्गत एल अन्ड टी कंपनीला दिलेल्या सुमारे २५० कोटी रुपयेच्या कामांचे नियमबाह्य पध्दतीने सब कॉन्ट्रॅक्ट देऊन महापालिकेची खूप मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे. एकाने दुसऱ्याला तिसऱ्याला असे सब सब कॉन्ट्रॅक्ट देऊन मूळ निकशानुसार काम न करता कामाच्या दर्जाची पार वाट लावून टाकली, असेही सिमा सावळे यांनी निदर्शनास आणून दिले. सल्लागाराने स्मार्ट सिटी कंपनी ऐवजी ठेकेदाराचे हित जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. सदर बाब अत्यंत संतापजनक आहे व स्मार्ट सिटीच्या मूळ हेतूलाच हरताळ फासणारी आहे, असेही सिमा सावळे यांनी स्पष्ट केले. सब-सब कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये फार मोठा घोळ असून केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका आणि तमाम करदात्यांची प्रचंड मोठी फसवणूक झाली आहे. या प्रकऱणात सखोल चोकशी करावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या पुढे झालेल्या सुनावणीत केली.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामांत प्रचंड मोठा घोटाळा असल्याचे जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी वारंवार निदर्शनास आणले. महापालिका आयुक्त हेच स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याने सावळे यांनी त्यासंदर्भात गेले वर्षभर सतत त्याच्याकडे पत्रव्यवहार केला. स्मार्ट सिटीतील घोळ मोठा असल्याने महापालिका प्रशासनाने त्यांच्या पत्रांना उत्तर देणेसुध्दा टाळले होते. अखेर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व पत्रांची दखल घेत सुनावणी सुरू केली आहे. आता आयुक्त राजेश पाटील या विषयावर नेमका काय आदेश देतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

आपल्या निवेदनात जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे म्हणाल्या, एल. एन्ड टी कंपनीला दिलेल्या कामांवर प्रशासन मुद्दामून दुर्लक्ष करत आहेत. सब कॉन्ट्रॅक्टिंगबाबत निविदेतील सर्व अटीशर्थींचे कसे उल्लंघन झाले त्याबाबत सिमा सावळे यांनी विस्ताराने आपला मुद्दा मांडला. त्या म्हणाल्या, निविदेच्या अटी – शर्तीच्या अनुषंगानेच अंतिमत: मास्टर सर्विस एग्रीमेंट तयार करण्यात येते. त्याच्या तरतुदींचा भंग झालेला असताना बेकायदेशीर कामकाजाला पाठीशी घालण्याचे काम राजकिय दबावापोटी सुरू आहे. एल अन्ड टी कंपनीने परस्परपणे व बेकायदेशीरपणे सब कॉन्ट्रॅक्टिंग केलेले आहे हे वास्तव आहे. हेच काम पुढे सब सब कॉन्ट्रॅक्टिंग केले आहे..

दरम्यान, अशा प्रकारे शहरभर स्मार्ट सिटीचे काम सब कॉन्ट्रॅक्टरच करत आहेत. त्यातील बहुतांशी राजकीय नेत्यांच्या बगलबच्यांना ही सब कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहेत. स्मार्ट सिटीच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. राजकिय नेत्यांचे कार्यकर्तेच ठेकेदार बनून काम करतात अथवा त्यांनी तिसऱ्याला सब कॉन्ट्रॅक्ट दिल्याचे लक्षात आले आहे. नेत्यांच्याच पाठबळावर सर्व सब कॉन्ट्रॅक्टिंगचे काम सुरू असल्याने चुकिच्या कामांत प्रशासन कुठलीच कारवाई करत नाही, अशी उघड चर्चा शहरभर आहे. याचा फटका आगामी महापालिका निवडणुकित सत्ताधारी भाजपाला बसण्याची दाट शक्यता आहे.

WhatsAppShare