सपा व बसपाला टक्कर देण्यासाठी अमरसिंह काढणार नवा पक्ष

153

लखनौ, दि. १२ (पीसीबी) – समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस आणि माजी राज्यसभा खासदार अमर सिंह नवीन राजकीय पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या सहकार्याने अमर सिंह नव्या राजकीय पर्वाला  सुरु करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला शह देण्यासाठी अमर सिंह यांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून त्यांना भाजपचा पाठिंबा असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. अमर सिंह नव्या पक्षाचे नाव १५ ऑगस्टनंतर जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. नवीन पक्षासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही सुरू करण्यात आली आहे. या पक्षाचा उत्तर प्रदेशातील पश्चिम भागावर जास्त लक्ष केंद्रित केले जाणार  आहे.

लोकसभा निवडणुकीत सपा आणि बसपा या दोन पक्षांना अडचणीत आणण्यासाठी भाजप या ठिकाणी अमर सिंह यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अमर सिंह यांनी जानेवारी २०१० मध्ये समाजवादी पक्षाला रामराम केला होता. त्यानंतर लगेच सपाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. अमरसिंह यांनी  राष्ट्रीय लोक दल या पक्षात प्रवेश करून फत्तेहपूर सिक्री या लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.