सध्या राज ठाकरेंचे ‘स्टॅंड अप कॉमेडी शो’ सुरु; विनोद तावडेंचा टोला

153

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो सध्या सुरु आहेत. शुक्रवारी नांदेडला शो झाला आणि लवकरच महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी त्यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो होणार आहेत, असे टीकास्त्र  शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोडले आहे.

राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकही  खासदार  आणि आमदार नाही, उरले सुरलेले नगरेसवक सुध्दा पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे स्वत:चा पक्ष संपला असताना दुसऱ्याला संपविण्याची भाषा, हे कशी काय करत आहेत, असा टोलाही त्यांनी  लगावला.

राज ठाकरे  आपल्या जाहीर सभांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून देण्याचे आग्रहाने आवाहन करत आहेत, त्यामुळे  त्यांच्या जाहीर सभांचा खर्च हा त्या सभेच्या ठिकाणच्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात करण्यात यावा, अशी मागणी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे तावडे यांनी  सांगितले.

तसेच जाहीर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविला गेला पाहिजे, याची माहितीही निवडणूक आयोगाने जनतेला द्यावी,  अशी मागणीही  करणार असल्याचे तावडे यांनी सांगितलं.