सध्या तरी काँग्रेसमध्ये, मात्र भविष्यातील सांगू शकत नाही – कृपाशंकर सिंह

210

मुंबई, दि. १५ (पीसीबी) –  सध्या तरी मी काँग्रेसमध्ये आहे, पण भविष्यातील मी सांगू शकत नाही, असे सुचक विधान काँग्रेसचे मुंबईतील ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी केले आहे. दरम्यान, कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असताना त्यांनी केलेल्या सुचक विधानामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुष्टी मिळत आहे.  

कृपाशंकर सिंह यांनी मुंबईतील घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. शुक्रवारी  बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे कृपाशंकर  भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यांना कोणता प्रसाद मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मात्र, कृपाशंकर सिंह यांनी सध्या तरी काँग्रेसमध्ये असून भविष्यातील मी काही सांगू शकत नसल्याचे  सुचक विधान करून भाजप प्रवेशांची चर्चांना अधिकच बळ दिले आहे. दरम्यान, मुंबईतील उत्त्र भारतीय समाजामध्ये सिंह यांचे चांगले वजन आहे. आगामी निवडणुकीत या समाजाला भाजपकडे वळवण्यासाठी कृपाशंकर यांची साथ महत्त्वाची ठरू शकते, त्यामुळे त्यांना भाजपकडून ताकद मिळण्याची शक्यता आहे.