सत्तेत राहून तोंडपाटिलकी करणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड – अशोक चव्हाण    

96

मुंबई, दि. १० (पीसीबी) –  ‘भारत बंद’ मध्ये सहभागी न झालेली शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. सत्तेत राहून तोंडपाटिलकी करणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (सोमवार) येथे केली.

अशोक चव्हाण पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, इंधनाचे वाढते दर  सरकारच्या हातात नाहीत, असे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. यावरूनच सरकार चालवण्यात मोदी अपयशी  ठरल्याचे दिसून येते. आंदोलन दडपण्याचा सरकारने प्रयत्न केला. मात्र,  जनतेने उत्फुर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला. व्यापारी आणि दुकानदारांनी दुकाने बंद ठेऊन आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे सांगून  बंद दरम्यान कुठेही हिंसक घटना घडली नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेला बंद सरकारने दडपण्याचा प्रयत्न केला, यावरूनच सरकार विरोधकांच्या एकजुटीला घाबरले, हे स्पष्ट झाले आहे, असे चव्हाण म्हणाले.   आम्हाला इतर पक्षांनीही साथ दिली. मात्र शिवसेनेचा वाघ आता डरकाळ्या फोडत नाही तर भुंकू लागला आहे, या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टचीही आठवण यावेळी  चव्हाण यांनी करून दिली.