सत्ता चुकीच्या लोकांच्या हातात गेली आहे – शरद पवार 

556

नवी दिल्ली,   दि. १० (पीसीबी) – सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी जी पावले उचलायला हवी होती, ती उचलली गेली नाहीत. सध्याचे सरकार जनविरोधी असून चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली आहे. त्यामुळे  जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे, अशी सडकून   टीका  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर  केली.  

काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात आज (सोमवार) भारत बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर  रामलीला मैदानावर धरणे आंदोलन  करण्यात आले. यावेळी शरद पवार बोलत होते.

पवार म्हणाले की, ३० ते ४० वर्षात काहीच झालेले नाही. चार वर्षातच आम्ही बहादुरी गाजवली, असे हे सरकार  म्हणत आहे. सरकारचे खरेच आहे. या सरकारने चार वर्षात मोठी बहादुरी केली आहे. या सरकारने चार वर्षात गॅसचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले ही बहादुरी केली. इंधन दर गगनाला नेऊन ठेवले ही बहादुरी केली. आंतराराष्ट्रीय बाजारात रुपया घसरला ही बहादुरी केली,  अशी खोचक  टीकाही त्यांनी केली.

विरोधी पक्षात असताना स्वत: अटलबिहारी वाजपेयी यांनीच भाजपला सुनावले होते. चाळीस-पन्नास वर्षात काहीच झाले नाही, असे म्हणणे म्हणजे भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांचा अवमान आहे. रोजगार वाढल्याकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार आहे, असं वाजपेयींनी सुनावले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.