सत्तर वर्षाच्या बापाला दुसऱ्यांच्या दारात मुजरा करायला लावणारे वंशाचे दिवे काय कामाचे – सुप्रिया सुळे

291

परभणी, दि. ११ (पीसीबी) – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेते आणि त्यांचे पुत्र जे भाजपमध्ये गेले त्यांच्यावर निशाना साधत जोरदार टिका अस्त्र सोडले आहे.

मंगळवारी संवाद यात्रेनिमित्त जिंतूर येथील जाहिर सभेत त्यांनी, “गेले अनेक वर्षे एका विचाराने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये राहिलेल्या नेत्यांची मुले आपल्या सत्तर वर्षाच्या बापाला दुसऱ्यांच्या दारात मुजरा करायला लावत आहेत. असे वंशाचे दिवे काय कामाचे? अशी घणाघाती टिका सुळे यांनी गेलेल्या राज्यातील काही नेत्यांच्या मुलांवर केली”.

यावेळी त्यांनी राज्यसरकारवरही जोरदार टिका केली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या भाजप सरकारने जनतेची दिशाभूल केली असून, भाजपमध्येच सर्वात जास्त भ्रष्ट मंत्री आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता त्यांना माफ करणार नसून मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा विश्वास व्यक्त केला.