सचिन वाजे सरकारी गणवेशधारी गुंड

106

मुंबई, दि. २ (पीसीबी) : महाराष्ट्रात पोलीस आणि राजकारण यांची अभद्र युती झाली असून ती आता तोडण्याची संधी आहे, असं मत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जे.एफ. रिबेरो यांनी व्यक्त केलं आहे. सचिन वाझे हा वर्दीतला गुंड असून परमबीर सिंह पोलीस दलावरचा डाग असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. रिेबेरो म्हणाले की, सध्या सुरु असलेल्या प्रकरणांमध्ये सचिन वाझेची नियुक्ती कोणी केली या प्रश्नात सगळं काही दडलं आहे. ते उघड झाले की सर्व उघड होईल. अनिल देशमुख, परमबीर सिंह यांनी मिळून हे काम केलं आहे. हे सर्व प्रकरण न्यायालयासमोर येणं आवश्यक आहे.

अंतुले, भुजबळ, देशमुखांच्या काळात पोलीस दलाची नसबंदी झाल्याचा घणाघाती आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी केला आहे. ते म्हणाले की, परमबीर सिंह हे चलाक आहेत. ते सत्ताधारी जो असतो त्याच्या बाजूने असतात. परमबीर सिंह यांना फरार घोषित करणे हे पोलीस दलासाठी लांच्छनास्पद आहे. परमबीर सिंह यांनी भारतीय पोलीस सेवेच्या लौकिकास डाग लावला आहे.
ज्युलिओ रिबेरो म्हणाले की, “सचिन वाजे सरकारी गणवेशधारी गुंड असून तो आणि प्रदीप शर्मा हे पोलीस दलात एका विशिष्ट कारणासाठी आले आहेत. हे ठरवून केलं गेलं आहे, त्यामुळे यांच्या नियुक्ती मागं कोण होतं हे जनतेसमोर यायला हवे. परमबीर सिंह हे न्यायालयाकडून मिळालेल्या सुरक्षेनंतर अचानक कसे प्रकट झाले?”

केंद्र सरकार परमविर सिंह यांचा वापर करत आहे असाही आरोप ज्युलिओ रिबेरो यांनी केला आहे. परमबीर सिंह यांना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महत्त्वाच्या पोस्टिंगवर नियुक्ती कशी करण्यात आली? काही वर्षात झटपट श्रीमंतीच्या प्रलोभनाला बळी पडणाऱ्या आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. या अधिकाऱ्यांच्या मदतीनेच राजकारण्यांनी महाराष्ट्रासह देशभरामध्ये हैदोस घातला आहे. आता ही अभद्र युती तोडण्याची ही योग्य वेळ आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या स्पर्धा परीक्षेतून 24 ही वयोमर्यादा शिथिल करणे हे घसरणीचा मार्ग खुला करणारं ठरलं असं ज्युलिओ रिबेरो म्हणाले. आर.आर. पाटील यांच्या काळात रिबेरो यांनी चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावे एक पत्र लिहून आर.आर. पाटील यांना कळवली होती. त्यावर त्या आर.आर. पाटील यांनी चोख काम केले असंही त्यांनी सांगितलं.