सगळे नालायक ठरल्याशिवाय तुम्हाला मनसेची आठवण येणार नाही – राज ठाकरे

99

औरंगाबाद, दि. १९ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांच्या हातात सत्ता दिली, त्यांनी राज्याची वाट लावली असून राज्याचा सत्यानाश केला आहे, असे टीका करून सगळे नालायक ठरल्याशिवाय तुम्हाला मनसेची आठवण येत नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

आजपासून (गुरूवार) राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून औरंगाबाद येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, ज्या पद्धतीने मला प्रश्न विचारता तसेच प्रश्न सत्ताधाऱ्यांना का विचारत नाही, असा सवाल त्यांनी माध्यम प्रतिनिधींना केला. हा दौरा संघटनात्मक बदलासाठी आहे. संघटनेत अनेक बदल केले जाणार आहेत,  असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अनेक ठिकाणी इव्हीएममध्ये घोळ असल्याचे निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. महापालिका निवडणुकींच्यावेळी आमच्या अनेक उमेदवारांना शून्य मते पडली आहेत. शून्य मते कशी पडू शकतात ? असा सवाल करून  त्या उमेदवाराला स्वत:चे तर मत पडू शकते की नाही, असा प्रतीसवाल त्यांनी उपस्थित केला. अशाच प्रकारे  संपूर्ण देशभरात घोळ सुरू आहे, असा आरोप करून त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.

राज पुढे म्हणाले की, ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले. त्या महाराष्ट्राचे आज प्रबोधन करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात आज एकमेकांकडे अत्यंत विखारी पद्धतीने पाहिजे जात आहे. प्रत्येकजण जातीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहे. देशातील प्रत्येक गोष्ट आरक्षणाच्या दृष्टीने पाहिली, तर आपले सगळे संपले म्हणून समजा, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेस-राष्ट्रवादी असो किंवा भाजपा-शिवसेना.. याच्यात जनतेचा नाहक बळी जात आहे. भारतातील समृध्द राज्याला आपला शत्रू कोण आहे हेच समजत नाही, त्यामुळे बाहेरच्यांचे फावते, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.